कंत्राटदाराच्या कथित आत्महत्येप्रकरणी भाजपच्या मंत्र्याला द्यावा लागणर राजीनामा

बंगरूळ – कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) यांच्या कथित आत्महत्येप्रकरणी नाव समोर आल्यानंतर कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा (K S Ishwarappa) यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर करणार असल्याचे सांगितले. राजीनाम्याची घोषणा करताना ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करत आहे. तुमच्या सहकार्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठेकेदार संतोष पाटील यांचा भाऊ प्रशांत याने ईश्वरप्पा यांच्या विरोधात तक्रार देऊन मंत्र्यांवर आरोप केले होते. कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचार (Corruption) आणि फसवणुकीचे (Fraud) आरोप करणारे कंत्राटदार संतोष पाटील यांनी मंगळवारी उडुपीमध्ये आत्महत्या (Santosh Patil committed suicide) केली. या आत्महत्येसाठी त्यांनी मंत्र्याला जबाबदार धरले आहे.

वृत्तानुसार, संतोष पाटील काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता आणि बेळगाव पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली होती. आपल्या मृत्यूसाठी ईश्वरप्पा थेट जबाबदार असतील आणि मंत्र्याला शिक्षा झाली पाहिजे असा संदेश त्याने आपल्या मित्रांना पाठवला होता.