Ghatkopar hoarding incident | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन भाजप आमदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, “कुठे फेडणार हे पाप”

Ghatkopar hoarding incident | मुंबईत काल दुपारनंतर अचानक सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडली, कुठे टॉवर कोसळला तर कुठे रेल्वे-वाहतूक सेवा ठप्प झाली. मात्र सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपर परिसरात घडली. घाटकोपर परिसरात भलामोठा होर्डिंग कोसळून (Ghatkopar hoarding incident) झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण या होर्डिंगखाली अडकले. हे होर्डिंग अनधिकृत असल्याने या घटनेची सर्वाधिक चर्चा झाली. दरम्यान आता या घटनेने राजकीय वळण घेतले असून याप्रकरणी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नाव समोर येत आहे.

वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपावरील १२० फुटांचे होर्डिंंग खाली कोसळले. यावेळी रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी असल्याने अनेकजण या होर्डिंगखाली अडकले. या अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि प्रशासनाकडून अतिशय वेगाने बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणांनी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडायला सुरुवात केलीय परंतु, या वादात आता भाजपचे आमदार राम कदम आणि किरीट सोमय्या यांनी उडी घेत या दुर्घटनेप्रकरणी थेट उद्धव ठाकरेंना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केलाय.

भावेश भिडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो राम कदम यांनी ट्विट केलाय. “14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे, श्रीमान उद्धव ठाकरेंच्या घरात. हे मनाला चीड आणणारे चित्र आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते. कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर… आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेतायेत. कुठे फेडणार हे पाप?, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केलाय.

तसेच या होर्डिंगला 1 जानेवारी 2020 ते 1 मार्च 2022 पर्यंत परवानगी आहे. शहाजी निकम यांनी ही परवानगी दिली होती. 40 फुटाची परवानगी असताना 120 फुटाचे होर्डिंग लावण्यात आले. याबाबत पोलिसांकडे हरकती नोंदवल्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या अनधिकृत होर्डिंगला उद्धव ठाकरेंचे संरक्षण आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनीही केलाय. त्यामुळे या दुर्घटनेत उद्धव ठाकरेंचे नाव आपोआप खेचले गेले आहे. आता उद्धव ठाकरे भाजपा नेत्यांच्या या आरोपांवर काय उत्तर देतात, ते पाहावे लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप