काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील – नवाब मलिक

मुंबई  – चीन संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल पटेल दिल्लीत गेले असताना पवारसाहेबांचा एक फोटो मॉर्प करुन भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध करुन जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही त्यांचा हा फर्जीवाडा समोर आणल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शुक्रवारी भाजपचे नेते नारायण राणे यांनी मार्चपर्यंत भाजपचे सरकार महाराष्ट्रात येणार असे भाकीत केल्यानंतर तात्काळ भाजपच्या आयटी सेलने पवारसाहेबांचा एक फोटो मॉर्प करुन सोशल मीडियावर शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र तात्काळ आम्ही पवारसाहेबांचा खरा फोटो जनतेसमोर आणला आणि भाजपचा फर्जीवाडा उघड केल्याचे नवाब मलिक म्हणाले.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस भविष्यवाणी करत होते मात्र ती भविष्यवाणी खरी झाली नाही त्यानंतर चंद्रकांत पाटील स्वप्नातही घोषणा करु लागले त्यानेही फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नारायण राणे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी तर नवसाच्या कोंबड्या व बोकड इतके जमवले की त्यांच्यासाठी राणेंना बोलावं लागतंय अशी खोचक टिकाही नवाब मलिक यांनी केली.

जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आता बरेच आमदार राष्ट्रवादीतून भाजपात गेले त्यांना थोपवून ठेवण्यासाठी भाजपचे नेते पुड्या सोडत आहेत. मात्र सत्य समोर आहे आणि काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.