“शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म”, भाजपा नेते निलेश राणेंचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शदर पवार (Sharad Pawar) यांनी सध्या देशात सुरू असलेल्या धर्मांतराच्या घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार एका कार्यक्रमात म्हणाले.

देशातील सद्यस्थितीत सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्यासाठी संभाजीनगर येथे आयोजित समरसता सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, “देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे चिंताजनक चित्र आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ख्रिश्चन समाजाच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत आहेत. मुस्लीम समाजात चार-दोन लोकांकडून चुका होऊ शकतात. तशा हिंदूंकडूनही चुका होतात. काही लोक जाणीवपूर्वक भेदाभेद कसा होईल, द्वेषभावना कशी वाढेल याची काळजी घेतात. हे या देशासमोरचं आज एक मोठं आव्हान मला दिसतंय.”

“ख्रिश्चन व मुस्लीम समाज धोक्यात आहे असं मी म्हणालो, कारण ओडिशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. चर्च आणि ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चूक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला का करायचा? हे जे घडतंय ते सहजासहजी घडत नाही. त्यामागे एकट्यादुकट्याचा हात नाही, त्यामागे एक विचारधारा आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही.” असं शरद पवार म्हणाले.

यावर आता भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी खोचक शब्दांत शरद पवारांवर टीका केली आहे. “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असं ट्वीटमध्ये निलेश राणेंनी म्हणाले आहेत.