सत्यजीत कदम यांना भाजपकडून कोल्हापूर उत्तरची उमेदवारी

कोल्हापूर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडी देखील ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी कदम यांचं नाव जाहीर केलं आहे. उमेदवारीसाठी सत्यजित कदम आणि महेश जाधव यांच्यात चुरस होती. मात्र, अखेर भाजपकडून सत्यजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास सत्यजित कदम यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.राजकीय जाणकारांच्या मतानुसार ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.