नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपाकडून काळजी घेतली जात आहे. भाजपाने आपल्या काही नगरसेवकांना पर्यटन वारीवर पाठविले आहे.
नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाला वगळता इतर चार जागी बिनविरोध निवडणूक होणार आहे. भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांना पक्षात घेत काँग्रेसने उमेदवारी दिली. काँग्रेसची राजकीय खेळी बघता भारतीय जनता पार्टी सावध झाली आहे. भाजपाने आपल्या काही नगरसेवकांना गोव्याला पर्यटनासाठी पाठविले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीने नगरसेवकांचा घोडेबाजार रोखण्यासाठी रविवारी रात्रीच्या विमानाने जवळपास २६ नगरसेवकांना गोव्याला पाठविले. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांचा घोडेबाजार होऊन मतं फुटू नये, यासाठी भाजपाने पक्षाच्या नगरसेवकांना मतदानापर्यंत बाहेर पाठवले आहे. भाजपाने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरवले असून, त्याअंतर्गत पहिल्या समूहाला गोव्याला पाठविण्यात आले आहे. उर्वरित नगरसेवक आज -उद्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. पुरुष नगरसेवकांना गोव्यात तर, महिला नगरसेवकांना उत्तर भारतातील पर्यटन स्थळावर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितल्या जात आहे. निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना नागपुरात परत आणल्या जाणार आहे. तो पर्यंत हे नगरसेवक पक्षाच्या खर्चावर पर्यटन वारी करणार आहेत.
निवडणुकीसाठी भाजपाने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने राजकीय खेळी-खेळात ऐन निवडणुकीच्या तोंडावर ३४ वर्षे भाजपासोबत राहिलेल्या डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली आहे, भोयर स्वतःच नगरसेवक असल्याने भाजपाला नगरसेवक फुटण्याची भीती आहे. भाजपामधील काही नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांच्या संपर्कात असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे काँग्रेस घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या मतांना फटका बसू नये म्हणून,भाजपाने हे सावध पाऊल टाकले आहे.
https://youtu.be/FkhUTw1OjTM