राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी – संजय राऊत

मुंबई – राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential election) जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (Leader of Opposition in Rajya Sabha Mallikarjun Kharge) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. यादरम्यान शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

यातच आता आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक अजब मागणी केली आहे. संजय राऊत यांनी, भाजपनेच शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते, असे संजय राऊत यांनी म्हटले.