खा.संजय राऊतांना मध्यावधीचे डोहाळे का लागले आहेत ?

मुंबई –  शिवसेना खा.संजय राऊत यांना मध्यावधी निवडणुकीचे डोहाळे लागणे साहजिकच म्हणावे लागेल. शंभर दिवसाचा मुक्काम ठोकुन बाहेर आल्यानंतर दुभंगलेल्या पक्षाच्या राजकिय वातावरणात कार्यकर्त्यांना खुश करण्याचे काम सद्या करू लागले असले तरी आहे ते खासदार, आमदार पुन्हा शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या तोंडी त्यांनी मध्यावधी निवडणुकीचे भांडवल घातलं. तेही कन्नड विधानसभा मतदारसंघात दोन महिन्यात होणार्‍या उलथापालथीचं राजकारण गप्प करण्यासाठी. मंत्री दानवे काय बोलले?त्याला पार्श्वभुमी स्थानिक राजकारणाची होती. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यासपीठावर दानवेंनी स्थानिक राजकारणाचा गौप्यस्फोट केला तिथे ठाकरे शिवसेनेचे आमदार उपस्थित होते पण उगीचच फुटलेला बांध पाणी सैरावैरा निघुन जावु नये म्हणुन केलेली सारवासारव  आहे अशी टीका भाजप प्रवक्ते  राम कुलकर्णी यांनी केली आहे.

ते म्हणाले, मध्यावधी निवडणुका दोन महिन्यात होणार. एव्हाना शिंदे-फडणवीस सरकार जाणार अशा प्रकारे कुठलेही वक्तव्य केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे यांनी केलंच नाही. कन्नड विधानसभा मतदारसंघात जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी दानवेसह ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना शिंदे-फडणवीस सरकार अचानक आलं का नाही? कुणाला तरी सरकार येईल असं वाटलं का? हे सांगताना स्थानिक राजकारणाचा संदर्भ देत आगामी दोन महिन्यात काही पण घडु शकतं असा गौप्यस्फोट त्यांनी केला. याचा अर्थ संजय राऊतांच्या एव्हाना मातोश्रीच्या काळजाला निश्चित भिडला तथा कळाला. पण आपलं झाकुन ठेवण्यासाठी राऊतांनी दिल्लीतुन दुसर्‍याचं वाकुन पाहिलं काय तर म्हणे दोन महिन्यात मध्यावधी निवडणुका याचे संकेत रावसाहेब दानवेंनी दिले. पण हे सरळ कसं तथ्यहीन? त्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिल्यानंतर लक्षात येते. मग संजय राऊतांनी मंत्री दानवेंच्या तोंडून मध्यावधीचं वाक्य का घालावं? खरं तर व्यक्तीस्वातंत्र्याचा हा शिस्तभंग म्हणावा लागेल. कारण नको ते वाक्य दुसर्‍याच्या तोंडून टाकणं हा गुन्हा सुद्धा असु शकतो.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊत बाहेर पडलेले आहेत. दिल्लीच्या वार्‍या होणं साहजिकच. काही दिवस त्यांनी शांतीची भुमिका घेतली. मात्र पुन्हा पोपटपंंची सुरू झाली. अजुन ठाकरे-शिवसेनेचे खासदार, आमदार फुटीच्या मार्गावर तोच राजकिय रंग कन्नडच्या कार्यक्रमात भरलेला होता. कदाचित भांबावलेली मानसिकता राऊतांची होणे साहजिकच. सत्ता बदलानंतर त्यांच्या पक्षाची झालेली वाताहत, मोठे मोठे पक्षाचे पुढारी, कार्यकर्ते, लागलेली गळती हे पहाता पक्ष नेतृत्वाला आपण मजबुत असल्याचे संकेत किमान अंतर्गत अबाधित रहाण्यासाठी द्यावेच लागतात. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासुन मजबुत आणि स्थिरतेने चालताना दिसत असुन आगामी काळात कुठलाही धोका सरकारला नाही याची प्रचिती दस्तुरखुद्द संजय राऊतांना देखील आहे. पण शेतात पाणी देताना एखादा बांध फुटल्यानंतर पाणी जसं सैरावैरा खुलेआम शेतात पळतं त्यावेळी शेतकर्‍यांची घालमेल होते आणि मग बांधाची बाजाबुजा करता घमेलघाईत तारांबळ उडते. तसं काही शिवसेना नेत्यांचं सद्या सुरू असल्याचे लक्षात येते.

संजय राऊतांची बोलीभाषा आणि बॉडी लँग्वेज आजही प्रसन्नतेची वाटते असं नाही. पण काही पण कुणाच्या तोंडून टाकायचं आणि आपल्या कार्यकर्त्यांना दिलासा द्यायचा.कदाचित ही राजकिय आयडॉलॉजी असु शकते. एक मात्र निश्चित मध्यावधी निवडणुकीच्या बाबत मंत्री रावसाहेब दानवेंनी कुठलंही विधान केलं नाही. स्थानिकच्या राजकारणावर केलेलं भाष्य थेट मध्यावधीवर आणण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊतांनी करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिली.