अश्लील संदेशाविरोधात भाजप प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची पोलिसांकडे तक्रार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विरोधात सोशल मीडियावर (social media)अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी अभिनेत्री दीपाली सय्यद (Actress Deepali Syed) यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत अश्लील, घाणेरडे संदेश पाठवले जात आहेत का असा प्रश्न उपस्थित करत आपण या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविण्यात असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले (Bharatiya Janata Party State Secretary Divya Dhole) यांनी बुधवारी सांगितले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रिदा रशिद उपस्थित होत्या.प्रगत महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महिलांना अशीच वागणूक मिळणार आहे का, हीच राज्यातील महिला सुरक्षितता आहे का असे सवालही ढोले यांनी यावेळी केले.

ढोले म्हणाल्या की, दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले. या विरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये सर्व पुरावे सादर करून दोन वेळा तक्रार नोंदवण्यास गेले असता चौकशीचे व कायदेशीर सल्ल्याचे निमित्त करत एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॉर्फ केलेली छायाचित्रे पाठवून मला मानसिक त्रास दिला जात आहे. याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले असून महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.