‘आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होणार’

पुणे – ज्या शक्तीने विरोधक गारद होतात, अशी शक्ती कार्यकर्त्यांनी निर्माण करावी, अशी माझी नेहमी आग्रही भूमिका असते. अटलशक्ती महासंपर्क अभियानामुळे हे साध्य झालं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत पुन्हा कार्यरत होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष  आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच आता यापुढे ही कार्यकर्त्यांनी लोकसेवेसाठी निरंतर कार्यरत रहावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज भाजपा पुणे शहरच्या वतीने आयोजित अटलशक्ती महासंपर्क अभियानाचा समारोप आ. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय आवारात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र तथा पुणे शहर संघटनमंत्री रवी अनासपुरे, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, ज्या शक्तीने विरोधक गारद होतात, अशी शक्ती कार्यकर्त्यांनी निर्माण करावी, अशी माझी नेहमी आग्रही भूमिका असते. अटलशक्ती महासंपर्क अभियानामुळे हे साध्य झालं आहे. त्यामुळे जे कुंपणावर होते, ते आता आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. या अभियानापूर्वी राजकीय विश्लेषण करणाऱ्या संस्था पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा ८० जागांवर विजयी होईल, असे सांगत होत्या. पण या अभियानानंतर महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत पुन्हा कार्यरत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, संघटना माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकसेवेसाठी निरंतर कार्यरत रहावे, त्यासाठी लोकसहभागातून सर्वतोपरी मदत करु, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.