उत्तर प्रदेशात भाजप 300 हून अधिक जागा जिंकणार – मोहसीन रझा 

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोलनं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि मणिपूरमध्ये भाजपची सरशी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता मिळवेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. उत्तराखंड आणि गोव्यात काट्याची टक्कर आहे आणि तिथं त्रिशंकू स्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सुरुवातीचे कल प्रथम उत्तर प्रदेशमधून आले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागांसाठी मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षही स्पर्धा देत असून 32 जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री मोहसीन रझा म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारने राज्यात केलेले काम अभूतपूर्व आहे, त्यामुळे लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. निकाल आल्यावर स्पष्ट होईल की आम्ही 300 हून अधिक जागा जिंकणार आहोत.