विधान परिषदेच्या सहा पैकी चार जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी; शिवसेना काँग्रेसला फटका

नागपूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मुंबईतील 2, कोल्हापूर , धुळे नंदुरबार, अकोला-बुलडाणा- वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिवसेना, 2 काँग्रेस 2 आणि भाजप 2 असं पक्षीय बलाबल होतं. मात्र, भाजपनं मुंबई आणि अकोल्याची जागा खेचून आणत विधानपरिषदेतील संख्याबळ वाढवलं आहे. भाजपकडून विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल, अमरिश पटेल आणि राजहंस सिंह, शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि काँग्रेसचे सतेज पाटील या निवडणुकीत विजयी झाले आहेत.त्यामुळे भाजपने  एकूण सहा पैकी चार जागी विजय मिळवत महाविकास आघाडी सरकारला धूळ चारली आहे.

दरम्यान, नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.