भाजपाने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले: नाना पटोले

प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न.

मुंबई – भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकारिणीची बैठक पक्ष मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, आमदार अमिन पटेल, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, AICC चे समन्वयक खान, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, इब्राहिम भाईजान यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ते बोलत बोलत होते, या बैठकीला मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून भाजपा सरकार काम करत आहे. जाती धर्माच्या नावावर भाजपा राजकारण करत आहे पण देशातील जनतेला भाजपाचा हा ढोंगी चेहरा समजला आहे. कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत भाजपाने हिजाबसारखे विविध धार्मिक मुद्दे उकरून काढले. पण ज्या नेत्यांनी धार्मिक मुद्द्यांवर भर दिला त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. कर्नाटकच्या जनतेने भाजपाचे धर्मांध राजकारण चालू दिले नाही. डबल इंजनच्या सरकारवर भाजपा भर देत होते पण मणिपूरमध्ये डबल इंजिनचेच सरकार आहे, तिथे आज काय परिस्थिती आहे हे आपण पहातच आहोत. मणिपूर जळत आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिकडे पाहण्यासही वेळ नाही.