तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park) पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), सह शिवसेनेला चांगलाच सुनावलं होत. यावर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांचं कालचं भाषण भाजपने (bjp) लिहून दिलेल्या स्क्रिप्ट सारखं होतं. त्यामुळे लोक आम्हाला लाव रे तो व्हिडीओ गेला कुठे? असं फेसबुक, ट्विटरवर विचारत आहेत. बऱ्याच मनसैनिकांनी आमच्याशी रात्री चर्चाही केली. आम्हाला वाटलं दोन वर्षाची मोरी तुंबलीय. त्या मोरीतून काही तरी निघेल असं वाटलं होतं. पण त्यातून काही निघालं नाही. तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत अनेक नेते घडले. त्याच मुशीतून हे देखील घडले. पण हे असे कसे बिघडले? याची उद्विग्नता मला कालपासून सतावत होती. त्यामुळे मी आज सकाळी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला नतमस्तक होण्यासाठी आली आहे, अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.