भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

सिंधुदुर्ग – शिवसेना आणि नारायण राणे संघर्षात प्रतिष्ठेची झालेली जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गड जिंकत 19 पैकी आतापर्यंत 11 जागांवर भाजपा तर 8 जागांवर महाविकासआघाडीचे सदस्य निवडून आले आहेत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाचे पॅनल प्रमुख माजी आमदार राजन तेली यांचा पराभव झाला आहे. बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा देखील पराभव झाला. सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याने ही निवडणूक गाजली. या प्रकरणी अद्यापही संशयित आरोपी आमदार नितेश राणे अद्यापही अज्ञातवासात आहेत.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी 19 जागा न मिळाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला असला तरी राजन तेली यांचा पराभव झाला आहे. पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली आणि शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यातील लढतीत नाईक यांनी तेली यांचा पराभव केला.