कंगना रनौतचा गायक दिलजीतवर निशाणा; म्हणाली, ‘देश से गद्दारी महंगी पडेगी’

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने पुन्हा एकदा दिलजीत दोसांझवर (Diljit Dosanjh) निशाणा साधला आहे. कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक आणि वारिस पंजाब डेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यावर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान, कंगनाने अभिनेता आणि गायक दिलजीतसाठी सोशल मीडियावर इशारा देखील दिला आहे. आजकाल सोशल मीडियावर चालणाऱ्या एका लोकप्रिय मीमचे उदाहरण देत कंगनाने लिहिले की, दिलजीत जी ‘पोल्स आगे पोल’.

कंगनाने काल (मंगळवारी) ट्विटरवर स्विगी इन्स्टामार्टची एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये विविध प्रकारच्या डाळींची छायाचित्रे दाखवली गेली आहेत. ही पोस्ट शेअर करत कंगनाने लिहीले होते “ओये पल्स आ गई पल्स.” तसेच या पोस्टवर कंगनाने दिलजीतलाही टॅग केले आणि पुढे #Justsaying असे लिहीले आहे.

मात्र हे प्रकरण केवळ इथेच थांबले नाही. त्यानंतर कंगनाने इंस्टाग्रामवरही यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून त्यापुढे “दिलजीत दोसांझ जी पोल्स आ गई पोल्स.” असे लिहीले आहे. एवढेच नव्हे तर तिने त्यासोबत धोक्याचे चिन्ह आणि हसणाऱ्या व्यक्तीचा फोटोही मीम स्वरुपात टाकला आहे.

तर पुढल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने लिहीले आहे की , “ज्यांनी खलिस्तानींना पाठिंबा दिला त्यांनी आता लक्ष द्या आणि लक्षातही ठेवा, पुढचा नंबर तुमचा असेल. पोल्स (पोलिस) आले आहेत. ती वेळ आता गेली, जेव्हा कोणीही काहीही करायचे. देशाशी गद्दारी करण्याचा किंवा (देश) तोडण्याचा प्रयत्न करणे महागात पडेल.” असेही तिने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या पोस्टसह कंगनाने पोलिसांच्या बेडीची इमोजी आणि एका महिला पोलिसाचा फोटोसुद्धा शेअर केलाय. यापूर्वीही दिलजीत आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावर अनेक वाक् युद्ध झाली आहे. मात्र, सध्याच्या कंगनाच्या या पोस्टवर दिलजीतने कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही.