शॉकिंग! सनी लिओनीच्या फॅशन शोच्या ठिकाणी मोठा स्फोट, अभिनेत्रीची तब्येत कशी आहे?

इम्फाल| बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक सनी लिओनीच्या (Sunny Leone) फॅशन शोच्या ठिकाणाजवळ स्फोट (Bomb Blast) झाला आहे. हा स्फोट खूप शक्तिशाली होता. या स्फोटाची माहिती शोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे समजत आहे.

खरं तर, एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी इंफालमध्ये एका फॅशन शोच्या ठिकाणाजवळ एक शक्तिशाली स्फोट झाला, ज्यामध्ये अभिनेत्री सनी लिओनी सहभागी होणार होती. मात्र, मणिपूरच्या राजधानीतील हट्टा कांगजीबुंग भागात घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

माध्यमांतील वृत्तांनुसार, शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास कार्यक्रमस्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. असे सांगितले जात आहे की, ‘फॅशन शोच्या ठिकाणी स्फोटक यंत्राचा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.’

इम्फालचे पूर्व एसपी महारबम प्रदीप सिंह यांनी एएनआयला सांगितले की, ‘कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आम्हाला संशय आहे की हे चीनी ग्रेनेडसारखे स्फोटक उपकरण आहे.’