शिंदे आणि फडणवीस हे दोघेच भरपूर काम करत आहेत; पण ‘टीम शिंदे फडणवीस’ कुठे आहे?

सतीश देशपांडे – आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये आरोग्य – कॅन्सर या विषयावरती चर्चा झाली, पण या चर्चेला आरोग्यमंत्री अभ्यासपूर्ण उत्तर देऊ शकले नाहीत. विधानसभेच्या अध्यक्षांनी हस्तक्षेप करून आपल्या दालनात या संदर्भात एक बैठक बोलावून यावर गंभीरपणे चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

अर्थसंकल्पावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणामध्ये पायाभूत सुविधा, अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन या संदर्भात उपस्थित केलेले प्रश्न अतिशय गंभीर आहेत. महामंडळाच्या संदर्भामध्ये त्यांनी मांडलेली भूमिका आणि महामंडळ हे कसे पांढरे हत्ती आहेत हे ठाऊक असतानाही सरकार लोकानुनय करत आहे, या संदर्भामध्ये त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारला योग्य ते उत्तर द्यावेच लागेल. मात्र सरकार प्रत्यक्ष कामे करण्याऐवजी लोकानुनयाकडे झुकत आहे असे दिसून येते.

कांद्याच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जो हमीभावाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले, परंतु मुख्यमंत्री बऱ्याचदा तातडीने आश्वासन देतात, प्रत्यक्ष कागदावरती याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे. शेतीच्या प्रश्नासंदर्भात कृषी मंत्री मात्र कुठलेही अभ्यासपूर्ण भाष्य करत असल्याचे दिसत नाही.

शिक्षण मंत्री आपल्या स्वतःच्या बुद्धीने जे काही नवे प्रयोग करून पाहत आहेत ते प्रयोग शिक्षणाच्या विकासास अजिबात पूरक नाहीत. उदाहरणार्थ पुस्तकालाच वह्यांची पाने जोडणे. शिक्षण मंत्र्यांना अजूनही शिक्षण खात्याच्या कामांचा पूर्णपणे आवाका आलेला दिसत नाही. ते अत्यंत वरवर आणि मनाला वाटेल तसे उपाय करत आहेत. या विषयावरती त्यांना अतिशय गंभीरपणे काम करता येऊ शकते मात्र ते खोलवर जाताना दिसत नाहीत. उच्च शिक्षण मंत्री हे कुठल्याही अर्थाने उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये काम करताना दिसत नाहीत. उच्च शिक्षण आणि त्या संदर्भातील समस्या गहन आहेत. त्या समस्यांचे अजिबात आकलन माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांना नाही. मुळात त्यांना या खात्यामध्ये इंटरेस्ट आहे का, हा प्रश्न पडतो.

उद्योग मंत्री कार्यरत आहेत. त्यांना उद्योग विषयाची जाण असल्याचे दिसून येते. मात्र उद्योग हे क्षेत्र असे आहे की या क्षेत्रात आज त्यांनी कितीही काम केले तरी त्याचे रिझल्ट तातडीने दिसणार नाहीत मात्र त्यांना सातत्य ठेवून काम करावेच लागेल. महिला आणि बालविकास मंत्र्यांनी धडाडीने काम सुरू केले, मात्र त्यांची दिशा चुकते आहे. महिला, कुपोषण, बालकामगार या संदर्भातले अतिशय गंभीर प्रश्न असताना ते लव जिहाद, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह यांसारख्या प्रश्नांमध्ये अडकले आहेत. भारतीय जनता पक्षाने आपला अजेंडा बाजूला ठेवून या विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडे डोळसपणे पाहायला हवे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही धडाडीने काम करत आहेत मात्र त्यांना आपली टीम हवी तशी साथ देताना दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडलेला आहे. राज्यमंत्र्यांना सोबत घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करून येणाऱ्या काळात विकास कामांवरतीच या सरकारला भर द्यावे लागेल, अन्यथा त्यांच्या बंडाला, त्यांनी दिलेल्या राजकीय पर्यायाला अर्थ राहणार नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी धावपळ करून चालणार नाही. त्यांना जोपर्यंत आपली टीम बांधता येणार नाही, तोपर्यंत ते महाराष्ट्राला यशस्वीपणे नेतृत्व देत आहेत असे म्हणता येणार नाही.