बुलढाण्यातील जि. प., पं. स. सदस्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Buldana District Guardian Minister Dr. Rajendra Shingane) यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध पक्षांमधील अनेक जि. प. व पं. स सदस्यांनी आणि अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) आज प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन मुंबई (Rashtravadi Bhavan Mumbai) येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

विदर्भात जेवढा पक्ष वाढायला हवा तेवढा पक्ष वाढलेला नाही, अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. देशात महागाईने जनता होरपळत आहे, मागील दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) जनतेने मोठा त्रास सहन केला आहे. तसेच इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असताना त्यातून जनतेला बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. मात्र काहीजण वेगळे विषय काढून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

कायदा व सुव्यवस्था (Law and order) चांगली असेल तर समाधानाने काम करता येते असेही अजित पवार म्हणाले. राज्यसरकार बळीराजाच्या हितासाठीही काम करत आहे. जे विकेल ते पिकेल यादृष्टीने सरकार पावले टाकत आहे अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

पक्षप्रवेश झालेल्या सर्व मान्यवरांचे बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीत स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राजकीय जीवनात काम करताना एक खमक्या नेतृत्वाची गरज असते. त्यामुळे पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळेल असेही ते म्हणाले.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामरकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात माजी सभापती सागर पाटील, पंचायत समिती सदस्य मेहकर, यवतमाळचे माजी उपसभापती सुरेश मेश्राम, बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, जिल्हा परिषद सदस्या ज्योती खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद मगर, मनोहर मस्के, माजी उपसरपंच, प्रशांत बोरे, संदिप गार्डे, अनंता बाहेकर, सतीश खेडेकर, अमोल खेडेकर यांनी पक्षात प्रवेश केला.

यासोबतच या कार्यक्रमादरम्यान अमृत पाटील नेरूळकर लिखीत ‘इतिहास नवी मुंबईचा’ या पुस्तकाचे (The book ‘History of Navi Mumbai’) प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाला नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, सेवादल नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष आहेर, दिपक भोपी हेदेखील उपस्थित होते.