‘अग्निपथ’ ही योजना आणून मोदीसरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केलीय – राष्ट्रवादी

मुंबई – ‘अग्निपथ’ (Agneepath) ही चार वर्षासाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी (Unemployment) असून ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. आयुष्यभराची बेरोजगारी अशी ‘अग्निपथ’ ही योजना असून या योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही (NCP) या योजनेला विरोध असल्याचे महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणाले.

एकीकडे ‘वन रँक वन पेंशन’ अशी योजना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दुसरीकडे बेरोजगार तरुणांसाठी ‘अग्निपथ’ अशी योजना आणून त्यात ‘नो रँक नो पेंशन नो ग्रॅज्युईटी’ आणतात. त्यामुळे ही योजनाच बंद करून केंद्रसरकारने तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्यात मोदीसरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आम्ही फक्त रोजगार दिला हे भासवण्यासाठी ‘अग्निपथ’ ही पोकळ योजना आणल्याचा आरोप करतानाच साडेसतरा ते २३ वर्ष हे तरुणांचे उमेदीचे वर्ष असून २४ किंवा २५ व्या वर्षी निवृत्त होऊन या तरुणांनी पुढे काय करायचे ? असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी केंद्र सरकारला ( Central Government) केला आहे.