म्हाडा भरती : अंतिम यादी प्रसिद्ध कधी होणार ? समोर आली ‘ही’ मोठी माहिती

Pune – म्हाडाने (MHADA ) जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या मात्र भरतीची अजूनही ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे. खरतर राज्यात सत्तांतर झाल्यावर राज्याला अतिशय कार्यक्षम असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले मात्र त्याचा काहीही फायदा या परीक्षार्थींना झाला नसल्याचे दिसत आहे. म्हाडाचा कारभार पूर्वीप्रमाणेच संथपणे सुरु असल्याचे दिसत आहे.

म्हाडाच्या या कारभारामुळे अनेक परीक्षार्थी चे भविष्य टांगणीला लागले असून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निकाल/ निवड यादी तसेच नियुक्त्या दिल्या जाव्यात अशी मागणी होत आहे. दरम्यान, आम्ही याबाबत म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांच्याशी संवाद साधला असता येत्या एक-दोन दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन सर्वांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान, यापूर्वी देखील म्हाडाकडून अशीच आश्वासने देण्यात आली होती आता तरी हे आश्वासन पाळले जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

म्हाडा प्राधिकरणात 2015 नंतर तब्बल 7 वर्षानी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये अर्ज भरून घेऊन जी परीक्षा डिसेंबरमध्ये होणार होती त्या भरती प्रक्रियेतील घोटाळा उघड झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीऐवजी म्हाडाने स्वतः ही परीक्षा घ्यावी असे आदेश सरकारने दिले. त्यानुसार म्हाडाने नामांकित टीसीएस कंपनीची नियुक्ती करून ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान अर्ज भरून घेतलेल्या जागांसाठी जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या.

दरम्यान, या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. निवड यादीतील ६३ उमेदवार बोगस असल्याचे समोर आले असून त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या म्हाडा स्तरावर चौकशी सुरू आहे. अनेक मुलांनी परीक्षा दिली असून याचा निकाल मे 2022 मध्ये जाहीर होऊन, जून महिन्यात कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली. या प्रक्रियेस अडीच महिने उलटले, व जाहिरातीस तब्बल 1 वर्ष उलटले तरी अजूनही अंतिम निकाल व निवड यादी म्हाडातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. जी प्रक्रिया साधारण 1 महिन्यात पूर्ण व्हायला हवी त्याला चालढकल केली जात आहे असे काही उमेदवारानी सांगितले.