सीबीआय’च्या छाप्यात अनिल रामोड यांच्याकडून सहा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त

Pune – पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना एका जमीन व्यवहारात आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयनं अटक केली आहे. सीबीआयनं काल रामोड यांचं कार्यालय, सरकारी निवासस्थान आणि खाजगी निवासस्थानावर छापे टाकून अनेक महत्वपूर्ण कागदपत्रं आणि रोख रक्कम जप्त केली.

सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा जास्त मोबदला मिळणार असल्याने रामोड यांनी पैशाची मागणी तक्रारदार यांच्या पक्षकाराकडे केली होती. पैसे न दिल्याने रामोड यांनी तक्रारदारांच्या पक्षकारांची जमिनीच्या मोबदल्याची प्रकरणे प्रलंबित ठेवली होती. रामोड यांनी तक्रारदाराकडे वाढीव नुकसानभरपाईच्या दहा टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. सुमारे सव्वा कोटी रुपये वाढीव भरपाईसाठी तक्रारदाराकडून दहा लाख आणि तडजोडीनंतर आठ लाख रुपये घेण्याचे ठरविले.

तक्रारदाराने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयने सापळा रचून रामोडला आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुण्यातील तीन ठिकाणी रामोड यांच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली असून त्यामध्ये सहा कोटी रुपये ; स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तांसह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे ; गुंतवणूक आणि बँक खाते तपशील आणि इतर दस्तऐवज जप्त करण्यात आले. रामोड यांना शनिवारी शिवाजीनगर  न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.