कंगाल झालेल्या पाकिस्तानींनी चोरले कॅमेरे! स्टेडियममधून १० लाखांचा मालही लुटला

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) एक विचित्र घटना पाहायला मिळाली आहे. वृत्तानुसार, या स्पर्धेदरम्यान गद्दाफी स्टेडियममधून लाखो रुपयांची चोरी झाली आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) किंवा गद्दाफी स्टेडियमच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मात्र, गद्दाफी स्टेडियममधून सीसीटीव्ही कॅमेरे, स्टेडियमवर प्रकाश टाकण्यासाठी जनरेटरच्या बॅटरी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फायबर केबलसह इतर गोष्टी चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची किंमत 10 लाख पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गद्दाफी स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी गुलबर्ग पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि अंतरिम पंजाब (पाकिस्तान) सरकार यांच्यात आधीच मतभेद आहेत. अशा स्थितीत स्टेडियममधील चोरीमुळे पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) अडचणीत सापडली आहे.

लाहोर आणि रावळपिंडी येथील आगामी सामन्यांचे भवितव्य ठरलेले नाही. पीसीबी आणि अंतरिम पंजाब सरकारमध्ये उघड ‘सुरक्षा खर्चा’वरून वाद सुरू आहे. वृत्तानुसार, स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा एकूण खर्च सुमारे 500 दशलक्ष पाकिस्तानी रुपये आहे. तथापि, पंजाब सरकार केवळ 250 दशलक्ष पाकिस्तानी रुपये देण्यास तयार आहे आणि उर्वरित 50 टक्के खर्च पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उचलावा अशी त्यांची इच्छा आहे.

पाकिस्तान बोर्ड तसे करण्यास तयार नाही. सुरक्षेचा खर्च भागवणे हे प्रांतीय सरकारचे कर्तव्य असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. वाद मिटला नाही तर सामने लाहोरला हलवले जाण्याची शक्यता आहे. पीएसएलमध्ये असे बदल झाल्यास मोठे नुकसान होईल, असे पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांचे मत आहे.

या प्रकरणावर रमीझ राजा म्हणाले होते, “पीएसएलचा आठवा हंगाम लाहोर/रावळपिंडीमध्ये न खेळवल्याने मोठे नुकसान होईल. ते होम अँड अवे संकल्पनेवर आधारित होते. केवळ एकाच शहरात सामने खेळल्यास चाहत्यांमध्ये स्पर्धेचा उत्साह संपुष्टात येईल.”