पेट्रोल डिझेलवर सेस वाढवून केंद्र सरकारने राज्याचे ३० हजार कोटी रुपये हडपले – पटोले

मुंबई – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मागील सात वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे. सतत दरवाढ करुन तिजोरी भरत असताना लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर ५ रुपये व डिझेलवर १० रुपये कमी केले आहेत. पण दुसरीकडे सेस लावून लोकांची लूट सुरुच आहे. उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे राज्यांना मिळणारा यातला वाटा कमी होणार आहे. अगोदरच केंद्र सरकारने १ मार्च २०२१ पासून ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत केंद्रीय उत्पादन शुल्कातून मिळणारे राज्य शासनाचे जवळपास ३० हजार कोटी रुपये हडप केले आहेत. केंद्र सरकार इंधनावर सेस वाढवून सामान्य जनतेचे आणि राज्य सरकारांचेही आर्थिक शोषण करत आहे हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना इंधनावरील कर कपातीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी आकडेवारी देऊन भाजपाची पोलखोल केली, ते पुढे म्हणाले की, सध्या देशात पेट्रोल वर २७.९० रुपये व डिझेलवर २१.८० रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते. नियामानुसार राज्य शासनाला पेट्रोलवर ११.१६ रुपये व डिझेलवर ८.७२ रुपये मिळणे आवश्यक होते. २०२०-२१ मध्ये राज्य शासनाला पेट्रोलवर प्रति लिटर १३.१६ रुपये देण्याऐवजी फक्त ५६ पैसे देण्यात आले व डिझेलवर १२.७२ रुपये ऐवजी फक्त ७२ पैसे देण्यात आले. केंद्र सरकारने १८ रुपये रस्ते विकास सेस व ४ रुपये कृषी सेस लावला. सेसमधला हिस्सा राज्याला मिळत नाही. त्यामुळे उत्पादन शुल्क कपात केल्याने राज्याला मिळणारा हिस्साचा कमी झाला. सेसच्या माध्यमातून केंद्र सरकार सामान्य जनता आणि राज्य सरकारांचे आर्थिक शोषण करत आहे. आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी असतानाही देशात पेट्रोल ११० रुपये आणि डिझेल १०० रुपये प्रति लिटर एवढ्या चढ्या दराने विकून मोदी सरकार जनतेची लूट करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे कमी झालेले दर पाहता पेट्रोल ६० रुपये लिटर असायला हवे होते पण केंद्र सरकार दर कमी करुन जनतेला दिलासा न देता त्यांना आर्थिक कमकुवत करत आहे.

केंद्र सरकारने कर कपात करुन जनेतेला दिसाला दिला तसा राज्य सरकारनेही द्यावा अशी भाजपाकडून मागणी केली जात आहे वास्तविक पाहता केंद्राकडून आकड्यांचा खेळ करुन दिलासा दिल्याचे चित्र निर्माण केले जात आहे परंतु यातून राज्य सरकारचा हिस्सा कमी होत आहे. पंजाब, राजस्थान येथील काँग्रेस सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही कर कपात करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष यांनी दिली.

कंगणा राणावतच्या बाष्कळ बडबडीला माध्यमांनी व्यासपीठ देऊ नये.

अभिनेत्री कंगणा राणावत वारंवार बाष्कळ बडबड करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अवमान करत आहे. कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये ही आमची विनंती आहे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

कंगणाच्या विधानावर बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कंगणा जी बडबड करत आहे ती भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग आहे. याला भाजपचाही पाठिंबा आहे असा आमचा आरोप असून भाजपने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी.

महाराष्ट्राला बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र. के. अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, गोविंद तळवळकर असे महान संपादक, पत्रकार लाभले, त्यांनी अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडाडून प्रहार केला होता. आपण सर्वांनी याची आपण सर्वांनी याची आठवण ठेवून कंगणासारख्या समाजविघातक विखारी प्रवृत्तींना प्रसिद्धी देऊ नये असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना केले आहे.

या पत्रकार परिषदेला आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे उपस्थित होते.