‘सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब पंढरी पुन्हा उभी राहण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू’

 सोलापूर :- सोलापूर (solapur) जिल्ह्यात डाळिंबाचे (Pomegranate) वर्षाला ३ हजार कोटींपर्यंत उत्पादन घेतले जायचे. यंदा ८०० कोटींचे उत्पादन मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. डाळिंबाची ही पंढरी धोक्यात आली असून महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब पंढरी पुन्हा उभी राहण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal)  यांनी केले.

महूद (mahud) ता.सांगोला येथे शेतकरी परिषद व जलक्रांती (jalkranti) करणाऱ्या ग्रामस्थांचा कौतुक सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जागतिक जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह, मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर, आमदार ऍड.शहाजी बापू पाटील, माजी आमदार दिपक साळुंखे,शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, अखिल भारतीय महात्मा समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते म्हणाले की, सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्हा डाळिंब पंढरी शेतकऱ्यांनी जिद्दीने, कष्टपूर्वक डाळिंब बागा उभ्या केल्या. त्याचा कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागला. मर रोग, तेलकट डाग या डाळींबाच्या प्रश्नावर मार्ग शेतकरी काढत होते. पण गेल्या २ वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींने डाळिंब उत्पादकांना बेजार केले. पिन होल बोरर रोगाने डाळिंब बागा जळून जाऊ लागल्या. रोग एवढा भयंकर की, बाग रोगातून वाचवणे शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले. त्यामुळे शेतकरी बागा तोडू लागलेत. डाळिंब पंढरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर पोचली. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार  साहेबांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन डाळिंब उभ्या करण्यावर भर दिला होता. या देशात शेतीची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे एकमेव नेतृत्व शरद पवार साहेब हे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा या डाळिंब उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबाचे क्षेत्र ४९ हजार हेक्टर होते.सांगोला तालुक्यातील क्षेत्र १९हजार हेक्टर होते.डाळिंब पंढरीतील ६० टक्के बागा तोडण्यात आल्यात, आणखी १० ते १५ टक्के बागा शेतकरी तोडण्याच्या मनस्थितीत आहेत. डाळिंब वाचण्यासाठी रोग भयंकर झाला आहे. रोग आटोक्यात आणण्यासाठी खर्च मोठा आहे. तो परवडत नसल्याने शेतकरी बागा तोडताहेत. त्यामुळे बागा वाचवण्यासाठी शासनाची मदत व्हायला हवी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
त्याचवेळी डाळिंब पंढरी पुन्हा उभी रहावी यासाठी शेतकरी मागणी करत आहेत. शेतकरी जुनी रोजगार हमी योजनेसारखी योजना असावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. ही डाळिंब पंढरी वाचवण्यासाठी खा. शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, कृषी मंत्री दादा भुसेजी यांच्यापर्यंत शेतकऱ्यांचा मित्र म्हणून डाळिंब पंढरीची व्यथा पोचवणार आहे. तसेच या प्रश्नांवर डाळिंब उत्पादकांच्या प्रतिनिधींसमवेत सरकार आणि प्रशासनाची बैठक व्हावी यासाठी माझा पाठपुरावा राहील. आधुनिक तंत्रज्ञान, नवे संशोधन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोचावे, असा माझा आग्रह राहील. एवढेच नव्हे तर मंत्रिमंडळ बैठकीत मी डाळिंब उत्पादकांची बाजू लावून धरेन, अशी ग्वाही देतो. डाळिंब उत्पादकांच्या सोबत सरकार पूर्वी होते आणि यापुढे राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की,दुष्काळमधून मुक्ती मिळवण्यासाठी महूद बुद्रुक (ता. सांगोला, जि. सोलापूर) ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानातून कासाळ ओढ्याचे पुनर्जीवन केले. त्यातून शेतीच्या आणि बाजारपेठीय अर्थकारणाला चालना मिळाली. गावाची मॉडेल व्हिलेजच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. जलसंधारणामध्ये गावाने नॅशनल वॉटर अॅवॉर्ड मिळवले. लोकसहभागाच्या चळवळीचा सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील २३ गावांमध्ये झालेला विस्तार, सामाजिक एकोपा असे क्षितीज विस्तारले. पाणी कमविण्यासाठी आणि शेती उर्जितावस्थेत आणण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांमधून प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे. त्यामध्ये महूद गाव अग्रेसर राहिले. आज एक हजार हेक्टरसाठी शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली. पाणी साठवण्यासाठी भले मोठं नैसर्गिक भांड तयार झाले पण वरुणराजा हजेरी लावत नाही म्हटल्यावर पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी ओढ्यात नमाज पठण करत वरुणराजाची आराधना केली. लोकसहभागातून काम करत असतांना सामाजिक सलोखा राखत या गावकऱ्यांनी आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात लोकसहभागाची चळवळ उभी राहू शकत नाही हा पारंपारिक गैरसमज महूदकरांनी खोडून काढला आहे. गावच्या पिण्याच्या पाण्याचं संकट टाळले. भूजल पातळीत वाढ झाल्याने डाळिंबाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले.शाश्वत पाण्यामुळे पीक पद्धतीत बदल झाला. विहीर, बोअर पुनर्भरणापासून ते छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यापर्यंतच्या विविध प्रयत्नांना चालना मिळाली. ओढ्याच्या दोन्ही काठांवर वृक्षारोपण करत टुरिझम स्पॉटची निर्मिती करण्याच्या प्रयत्न सुरु आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब असून राज्यभरात असे उपक्रम शासनस्तरावर राबविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह (Rajendra sinh) , मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर, आमदार ऍड.शहाजी बापू पाटील, माजी आमदार दिपक साळुंखे,शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.