दात पडले, पण कॅच नाही सोडला! श्रीलंकेच्या चामिकाचे तोंड रक्तबंबाळ; रुग्णालयात दाखल

श्रीलंकेत सध्या लंका प्रीमीयर लीग ही टी२० लीग सुरू आहे. या लीगमध्ये काल (०८ डिसेंबर) एका सामन्यात मोठा अपघात झाला आणि एका स्टार क्रिकेटपटूला दुखापत झाली. हा खेळाडू श्रीलंकेचा अष्टपैलू चामिका करुणारत्ने (Chamika Karunartne) असून त्याच्या तोंडावर जोराने चेंडू आदळला. चेंडू जोराने लागल्यामुळे चामिका रक्तबंबाळ झाला. त्याचे पुढील २-३ दातही पडले असल्याचे म्हटले जात आहे. या प्रसंगानंतर काही वेळ सामना थांबवण्यात आला आणि चामिकाला रुग्णालयात नेण्यात आले.

ही घटना लंका प्रीमीयर लीगमध्ये बुधवारी कँडी फॅलकॉन्स आणि गॉल ग्लॅडिएटर्स संघात सामना खेळला गेला. चामिका फॅलकॉन्स संघाकडून खेळत होता. ग्लॅडिएटर्स संघाची फलंदाजी सुरू असताना चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा अपघात झाला. फॅलकॉन्सकडून कार्लोस ब्रेथवेट गोलंदाजी करत होता. त्याच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर फर्नांडोने कव्हरच्या वरून हवाई फटका खेळला, ज्याचा झेल टिपण्यासाठी चामिका पळाला.

सीमारेषेकडे उलट्या दिशेने धावत चामिकाने झेल तर टिपला. परंतु यादरम्यान त्याचा जबडा गंभीररित्या जखमी झाला. चेंडू त्याच्या हातात येण्यापूर्वी सरळ त्याच्या जबड्यावर जाऊन लागला. मात्र चामिकाने अचूक झेल टिपला आणि नंतर त्वरित जवळच्या संघ सहकाऱ्याकडे चेंडू फेकला. त्यानंतर चामिकाच्या तोंडून रक्त येऊ लागले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने चामिकाला अर्ध्या सामन्यातून रुग्णालयात दाखल करावे लागले. मैदानातील या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.