उद्धवजी लोण्याचा गोळा कोण मटकावतंय तुमच्या लक्षात आलंय का ? – चंद्रकांत पाटील

मुंबई : काल लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस आहे. मात्र या निवडणुकीत सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसला असून एकूण कामगिरीच्या बाबतीत शिवसेना खालच्या क्रमांकावर गेली आहे. राज्यात ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्या पक्षाची एवढी निराशाजनक कामगिरी कशी झाली ? यावर आता राजकीय वर्तुळात चवीने चर्चा रंगत आहेत.

मात्र दुसरीकडे या निकालांवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची आणखी एक संधी भाजपला मिळाली आहे. महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने समाधानकारक कामगिरी केली, शिवसेनेला मात्र म्हणव तसं यश मिळाले नाही. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पाहता, जिप निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला आहे. तर तीन पक्षांशी लढत असूनही पंचायत समितीतही भाजपाची कामगिरी दमदारच झालेली आहे. निकालाबद्दल मतदारांचे आभार, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू. अस चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तर, एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना मात्र या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनभावना लक्षात घेण्याइतके सुज्ञ नक्कीच आहेत. असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हे ही पहा: