चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय – जयंत पाटील

रत्नागिरी : चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेवर व इतर प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टिका करत आहेत मात्र त्यांना इतकं महत्त्व देण जुरुरी नाही, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले

भाजपाने एका अधिकाऱ्याच्या बाबतीत एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नवाब मलिकजी माहिती उघड करत आहेत त्याला समीर वानखेडे उत्तर देतील. मात्र समीर वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावर राज्यातील सामान्य माणसाला निर्माण झालेली शंका किंवा आर्यन खान यांच्या कारवाईतील नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीत सर्व काही उघड झाले आहे. यात समीर वानखेडे आणि नवाब मलिक आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील. यामध्ये पडून भाजपाने त्यांचा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

भारतात १२० कोटी लोकसंख्या असतानाही केंद्रीय यंत्रणेला केवळ महाराष्ट्रातील आणि त्यांच्याविरोधी बोलणारे त्यातही केवळ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातील नेते दिसत आहेत. बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील खासदारच सांगतात की, आता आम्हाला रात्रीची शांत झोप लागते. म्हणजेच भाजपात तुम्ही गेलात की सगळ्याला अभय आहे. परंतु विरोधात आवाज उठवला की त्यांची दहा-वीस वर्षांपूर्वीची कागदं काढायची आणि चौकशीचा ससेमिरा सुरु करायचा, रेड टाकायची, त्यांची बदनामी करण्याचे काम केंद्रीय यंत्रणा करतेय हे दुर्दैव आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.