मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील; भाजपाचं सणसणीत प्रत्युत्तर

Jalgaon – जळगावच्या पाचोऱ्यामध्ये काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या घराणेशाहीविरोधातील भूमिकेबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.

“आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. मी घरी बसून सरकार चालविले, मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण करून करू शकणार नाही. मी घरी बसून केले म्हणून ही माणसे आज आलीत. घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. खरंतर त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. १५० पेक्षा जास्त देशांनी मोदीजींना पसंती दर्शवली आहे. त्याच मोदीजींचा तुम्ही एकेरी उल्लेख केला. मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील. मोदीजींचं इतकं मोठं वादळ महाराष्ट्रात येणार आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वादळाला हे (उद्धव ठाकरे) घाबरतात म्हणून सतत मोदीजी – मोदीजी करून टाईमपास करत असतात. मोदीजींची उंची काय, तुमची उंची काय याचा विचार कराल का? तुमच्याजवळ दोन जण राहायला तयार नाहीत. मोदीजी जगात मान्यता मिळवतात. भारताला सर्वोत्तम करण्याचा संकल्प करतात आणि तुम्ही त्यांची खिल्ली उडवता”, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.