वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद; पहा व्हिडीओ 

 हुबळी   –  कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांची मंगळवारी सकाळी वार करून हत्या करण्यात आली. हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेल (Hotel President)मध्ये ही घटना घडली.  गुरुजी व्यवसायानिमित्त कोणालातरी भेटण्यासाठी प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आले असल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येची संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिस आयुक्त एन लभुराम (Commissioner of Police N Labhuram)यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी गुरुजींवर चाकूने वार केले. या घटनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, काही लोकांनी ते  ज्या हॉटेलमध्ये राहत होते  त्या हॉटेलच्या लॉबी एरियात त्यांना बोलावले. एका व्यक्तीने त्यांना नमस्कार केला आणि नंतर अचानक अनेक वार केले. यानंतर गंभीर जखमी झालेले चंद्रशेखर गुरुजी यांना रुग्णालयात नेले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन पुरुष चाकू घेऊन फिरताना दिसत आहेत. या खुनाच्या घटनेने घाबरलेल्या आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला. मारेकरी त्यांचे भक्त म्हणून हॉटेलमध्ये आले होते, असे सांगण्यात येत आहे. आणि नंतर त्याच्यावर एकामागून एक चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर हॉटेलसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.