असीम सरोदे ट्वीट करण्याआधी आपलं डोकं तपासा; द काश्मीर फाईल्सवर टीका करणाऱ्या सरोदेंना दवेंचा सल्ला

पुणे – काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत. या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत आहेत तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे तसेच काही मंडळी यावर टीका देखील करताना दिसत आहेत.

यातच आता वकील असीम सरोदे यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट देखील चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, काश्मीर फाईल्स ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे. असत्याला सत्याचे कपडे घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सरोदे यांना ट्रोल देखील केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी सरोदे यांना आपलं डोकं तपासून घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, असीमजी सरोदे ट्वीट करण्याआधी आपलं डोकं तपासा. जर काश्मीर मधे हिंदूं वर अन्याय झाला नाही तर लाखों लोकांनी आपली पारंपरिक घरे का सोडली, का एका रात्रीत काश्मीर हिंदू विरहित राज्य झाले, का त्यांच्या बाजूने कोणीच बोललं नाही, का आज पर्यंत कोणाला शिक्षा झाली नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, हिंदू बहुल राज्य सेक्युलर हवा असणाऱ्यांना काश्मीर मात्र मुस्लिम राज्य हवं असतं हे का ? हिंदूंची संख्या कमी झाली की काय होऊ शकते हे दाखवणारा हा चित्रपट आहे आणि त्याचं सर्व हिंदू स्वागत करीत असताना असीमजी यांना मिरच्या लागण स्वाभाविक आहे आणि ते घडत आहे. काश्मीर फाईल सारखे चित्रपट हे आमची भूमिका मांडणारे चित्रपट आहेत आम्ही त्यांच स्वागतच करू.