नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – छगन भुजबळ

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ईडीने केलेली कारवाई अतिशय दुर्दैवी आहे. वडाची साल पिंपळाला लावून नवाब मलिक यांना अटक करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा कारवाईतून विरोधकांना आसुरी आनंद मिळू देणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक अनेक दिवसांपासून केंद्र सरकारविरोधात आपली भूमिका मांडत होते. त्यामुळे ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मलिक यांचा संबंध दाखवून त्यांचे तोंड दाबण्यासाठी ही कारवाई करून अटक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे भुजबळ म्हणाले. अशाप्रकारे लोकशाहीविरोधी वागणे अतिशय निषेधार्ह असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आकसाने होत असलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी तीनही पक्षांकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यानंतर राज्यभर तीनही पक्षांच्यावतीने शांततामय मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.