Chhagan Bhujbal | जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला देश जगामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) उमेदवार डॉ.भारती पवार व नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज कृषि उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्रा.देवयानी फरांदे, सिमाताई हिरे, दिलीपराव बनकर, डॉ.राहुल आहेर, नितीन पवार, राहुल ढिकले, सुहास कांदे,सरोज अहिरे, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ.भारतीताई पवार,नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशन अंतर्गत देशातील १४ कोटी घरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. त्यामुळे देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळणार आहे. पंतप्रधान घरकुल योजनेसह विविध घरकुल योजनेच्या माध्यमातून देशांत २० कोटीहून अधिक घरांची उभारणी करण्यात आली.पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील १८ पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना समृद्ध करण्यात येत आहे.
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सरकार काम करतय असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पीएम गरीब कल्याण योजना-८० कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधान मंत्री किसान सन्मान योजना,नमो शेतकरी महासन्मान योजना यासह विविध योजना राबविल्या जात आहे. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवणारी मांजरपाडासारखी अतिशय पथदर्शी योजना राबवण्यात आली आहे. यापुढील काळात वळण योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याला पुरवण्यासाठी सरकार काम करेल असे त्यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होईल. त्यामुळे मोदींजीचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून द्यायचे आहे. त्यासाठी कुठलाही संशय कल्लोळ थांबवा फक्त उमेदवार निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
नाशिकही जशी यंत्रभूमी, तंत्रभूमी आहे पण ती कृषि भूमी सुद्धा आहे हे विसरता येणार नाही. अर्ध्या मुंबई शहराला नाशिक जिल्ह्यातून कृषी माल पुरवला जातो. येथे भाजीपाला, द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धर्तीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन पर रक्कम दिली जावी अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप