Chhagan Bhujbal | नाशिकच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या

Chhagan Bhujbal | मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी नाशिकच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड,  मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.माणिकराव कोकाटे,आमदार सीमा हिरे,आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर अशोक मुर्तडक, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, लक्ष्मण सावजी,प्रशांत जाधव, दिनकर पाटील, सलीम शेख यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ते म्हणाले की, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशात महामार्गाचे मोठ जाळ निर्माण करण्यात आलं आहे. त्यांच्याकडे  सशक्त भारताची दृष्टी आहे आणि २१ व्या शतकातील राजकारण हे प्रगती आणि विकासाचे राजकारण आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांचे लक्ष नेहमीच कर्तृत्वावर असते. त्यांनी अनेक कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली. नितीन गडकरी हे विकासाचे व्हिजन असलेल देशातील एक महत्वाचे नेतृत्व असून त्यांच्या या कार्याबद्दल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पुढील काळात नाशिक मुंबई महामार्ग, नागपूरच्या धर्तीवर सारडा सर्कल ते नाशिक रोड तीनमजली उड्डाणपूल, मेट्रो साकारण्यात येईल. आगामी काळात नाशिकला कुंभमेळा होतो आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासासाठी नरेंद्र मोदीजी यांच्याकडून आपल्याला भरघोस असा निधी प्राप्त होईल. नमामि गंगे – नमामि गोदा हे प्रकल्प मार्गी लावला जाईल. तसेच गेल्या दहा वर्षात देशात विकासाचा जो वेग आहे. तो यापुढेही कायम ठेवून जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्यासाठी आपल्याला महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून द्यायचा आहे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं त्यांचे हे व्हिजन आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. जगभरात भारताच नाव अधिक उंचीवर राहण्यासाठी आज नरेंद्र मोदी यांच्या सारखं दुसरं कुठलंही नेतृत्व दिसत नाही. आज विरोधक संविधान धोक्यात असल्याची बोंब उठवत असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, राज्यात महायुती सरकारने समृद्धी महामार्गाची निर्मिती केली. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना दुप्पट नुकसान भरपाई दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशन अंतर्गत देशातील १४ कोटी घरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. पंतप्रधान घरकुल योजनेसह विविध घरकुल योजनेच्या माध्यमातून देशांत २० कोटीहून अधिक घरांची उभारणी करण्यात आली. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील १८ पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना समृद्ध करण्यात येत आहे.पीएम गरीब कल्याण योजना-८० कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले.
प्रधान मंत्री किसान सन्मान योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली असून मोदींजीचे हाथ अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, माध्यमांमध्ये भुजबळ नाराज असल्याच्या वावड्या उठविण्यात येत आहे. मात्र आपण स्वतः उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्याने नाराज वगैरे काही नाही. त्यामुळे किंतू परंतु मनात न ठेवता केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हाथ बळकट करण्यासाठी आपण महाराष्ट्रभर काम करतोय असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप