कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

कोल्हापूर : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आहे.

शिवप्रेमींनी कानडी व्यवसायिकांना दुकान बंद करायला भाग पाडले आहे. कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. शिवप्रेमी कडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकतील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना केली, त्याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच तापले आहेत.

बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद कोल्हापूर आणि बेळगावात उमटले. शिवभक्तांनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात जमून या घटनेचा निषेध केला. समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केलीय. बेळगावमध्ये सध्या जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. तर कोल्हापुरातील शिवाजी चौकात शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. यावेळी शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.