‘महापुरूषांचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, पण कायदा हातात घेऊ नका’

नाशिक : नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले.

रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत कायदा हात न घेण्याचे आवाहन केले आहे.

‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिहीले गेले असेल तर नक्कीच निषेध करायला हवा. महापुरूषांचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.. पण शाई फेक करून निषेध करणे हा पर्याय होऊ शकत नाही…तर्काला उत्तर तर्कानं द्यावं…कोणीही कायदा हातात घेऊ नये…’ असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

तर, राष्ट्रवादीचे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘नाशिकमधील साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासण्याची घटना लोकशाहीवादी पुरोगामी महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी आहे. निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत योग्य नव्हे. या घटनेचा योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.’ अस वळसे-पाटील म्हणाले आहेत.