‘महिलांप्रती पुरूष लोकप्रतिनिधींच्या भावना काय आहेत हे दिसून आलं’

 मुंबई : गुरुवारी कर्नाटक राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. ‘तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,’ असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभापतींना उत्तर देताना सांगितलं की, ‘एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले. कुमार यांनी यापूर्वी २०१८-१९ मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी टिप्पणी केली होती.

या प्रकारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘लोकशाहीचे पवित्र मंदिर विधानभवनाचा आब घालवणारी घटना कर्नाटक विधानसभेत घडलीय, महिलांप्रती पुरूष लोकप्रतिनिधींच्या भावना काय आहेत हे दिसून आलं…बोलणा-यासोबतच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून हसणारे पण दोषी. बेताल…बेजबाबदार..असंवेदनशील पुरूषीवृत्ती कडूनच महिलांचे रक्षण करण्याची गरज आहे’ असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेस आमदारच्या या खालच्या पातळीच्या वक्तव्यावर आता देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ज्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासारखी एक सक्षम स्री आहे. ज्या पक्षाचे शीर्ष नेतृत्व प्रियांका गांधी यांच्यासारखी एक संवेदनशील नेता करते अशा कॉंग्रेस पक्षात रमेश कुमार यांच्यासारख्या निर्लज्ज आमदारावर काही कारवाई होणार का ? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.