‘सरकारनं सर्वज्ञानी संजय राऊतांना रोड रोमियोंचे ब्रॅंण्ड ॲम्बेसेडर म्हणून तरी जाहीर करावं’

मुंबई : भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रर दिली होती. याप्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी संजय राऊत यांच्‍यावर गुन्हा दाखल केला होता.

एका मुलाखतीदरम्यान राऊतांनी भाजपा कार्यकर्त्याविरोधात अपशब्द वापरले असल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रार दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी दिल्ली पोलिसांना ओपन चॅलेंज दिले आहे.

मी महिलांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. तरीही दिल्‍ली पोलिसांनी माझ्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे. मी दिल्‍लीतच आहे. माझ्‍यावर कारवाई करावी, असे म्हणत दिल्‍लीतही शिवसेना आहे, याचाही विचार करावा, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘जाहीरपणे शिवीगाळ करत ‘रोड रोमियो’ सारखी भाषा करणा-या सर्वज्ञानी संजय राऊतांवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला. पण अद्याप राज्य सरकारनं ना दखल घेतली ना कारवाई करण्याची हिम्मत दाखविली…महाविकास आघाडी सरकारनं सर्वज्ञानींना रोड रोमियोंचे ब्रॅंण्ड ॲम्बेसेडर म्हणून तरी जाहीर करावं’ असा टोला चित्रा वाघ यांनी लावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

शरद पवारांना खुर्ची देण्यावरून सुरु झालेल्या वादाला संजय राऊत यांनी उत्तर देताना म्हंटले होते की, ‘पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. चू*यागिरी बंद करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

हे देखील पहा