कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंगाचे वाटप; चित्रा वाघ यांनी सरकारला झापलं 

बुलडाणा  : वाढती लोकसंख्या ही देशासमोरील एक मोठी समस्या आहे. यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपापाययोजना राबविल्या जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्यासार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा वाटा असतो. या विभागाकडून कुटुंब नियोजनाचा  उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय. मात्र, राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे समोर आलंय.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारच्या या निर्णयामुळे आशा वर्कर समोर अजब समस्या निर्माण झाली आहे. कारण रबरी लिंग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी समाविष्ट करण्यात आलं आहे. आता ते घेऊन गावात फिरायचे कसे? आणि प्रात्यक्षिक कसे दाखवायचे  हा मुख्य सवाल असून यामुळे आशा वर्कर महिलांची कुचंबना होत आहे.

प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर जायचं कसं? या विवंचनेत आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळत आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.