पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे ‘खेळ खल्लास’ ही भावना एकुणच बळावलेली दिसते – चित्रा वाघ

मुंबई – देशभरातील भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत असून अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.महाविकास आघाडीतील नेते मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, आयकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप  करत आहेत. हीच महाविकास आघाडीची भूमिका  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत तर खासदार संजय राऊत यांनी सामना मधून सरकारवर टीका केली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तुरूंगात जायला तयार असल्याचे देखील म्हटले आहे.

सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,  तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधीच कसं समजतं? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा, असं  मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, काय झालंय ठाकरे सरकारच्या धुरीणांना… सर्वज्ञानी संजय जी राऊत आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तुरूंगात जायला तयार…आणि ताई तर म्हणतात मला फाशी द्या…पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे ‘खेळ खल्लास’ ही भावना एकुणच बळावलेली दिसते….असा टोला वाघ यांनी लगावला आहे.