प्रेयसीच्या बापाकडून प्रियकराचा सिनेस्टाईल खून, मृतदेह शेतात पुरला

नांदेड : प्रेमसंबंध जुळलेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या वडिलांनीच सहकाऱ्यांच्या मदतीने ३१ ऑक्टोबर रोजी निर्घून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही घटना हासनाळ (प.मु. ता. मुखेड) येथे घडली. महिनाभरानंतर खूनाचा उलगडा झाला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपींना मुखेड न्यायालयात हजर केले असता १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

चार महिन्यापुर्वी मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.मु.) येथिल सुर्यकांत नागनाथ जाधव (२२) याचे गावातच असलेल्या नातलगातील मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. सदरील प्रेमसबंधाची कुणकुण मुलीच्या वडीलांना लागल्याचे सुर्यकांतला समजताच भितीने त्याने गाव सोडले होते. मात्र, चार महिण्यानंतर पुन्हा तो ३१ आॕक्टोबर रोजी गावाकडे  येत होता. सुर्यकांत गावाकडे येत आसल्याची माहीती मुलीच्या वडीलांना मिळताच सुर्यकांतचा कायमचा काटा काढायचाच या हेतुने आपल्या मेहूण्यासह गावाकडे येणाऱ्या सुर्यकांतला रस्त्यात गाठून रावणगाव शिवारातील शेतात त्याचा खून केला. या घटनेची बाहेर वाच्चता होऊ नये म्हणून मृतदेह खोल खड्डा करुन पुरुन पुरावा नष्ट केला.

दरम्यान सुर्यकांत घराकडे आला नाही व त्याचा  फोनही लागत नसल्याने भाऊ रवीकांत जाधव यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर तो सापडत नसल्याने अखेर मुक्रमाबाद पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुक्रमाबाद ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक  गोपीनाथ वाघमारे व गजानन कांगणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी माधव सोपान थोटवे (रा. हसनाळ (प.मु.) व पंढरी गवलवाड (रा.कोळनूर) या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना मुखेड न्यायालयात हजर केले असता आरोपींना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.  चौकशी दरम्यान रविवारी (दि.२८) सायंकाळी ४ वाजता आरोपीसह पोलीस घटनास्थळी जाऊन पुरलेला मृतृदेह ताब्यात घेतला. जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार महेश हांडे, देगलुचे एपीआय कमलाकर गड्डीमे, तलाठी बळीराम कदम, यादव इबीतवार बाऱ्हाळी पोलीस चौकीचे जमादार योगेश महिंद्रकर, बब्रूवान लुंगारे, माधव पवार हे तपासात मदत करत आहेत.