Mahesh Landge :- मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे व पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत इंद्रायणी नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली.
दरम्यान, इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली असून, आज दुपारी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परपरिस्थितीची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त् आण्णा बोदाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील विविध ठिकाणच्या जवळपास १ हजाराहून अधिक नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच मदत व बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक शहरात दाखल झाले असून बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड या यंत्रणांना देखील सज्ज ठेवली आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील मोशी, चऱ्होली, चिखली, कुदळवाडी मोई, भोसरी परिसरात आमदार लांडगे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नदी काठच्या परिसरात पाहणी केली. स्थानिक नागरिक आणि जनावरांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी देखील याकामी महापालिका प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आवाहन केले. तसेच पोलीस यंत्रणा आणि महापालिका आपत्कालीन यंत्रणा यांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप