लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांना घ्यावी लागणार ‘ही’ खबरदारी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात लग्न सराई सुरू झाली आहे. यानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील (अन्न) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

पाटील यांनी म्हटले आहे, लग्नानिमित्त जेवणावळीचे कंत्राट हे कॅटरिंग व्यावसायिकास देण्यात येते. लग्नानिमित्त होणाऱ्या जेवणावळीत अनेकजण जेवण करतात. त्यामुळे या अन्नाचा दर्जा तसेच त्याची तयार करण्याच्या कार्यप्रणालीबाबत अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यानुसार लग्नानिमित्त जेवणाचे कंत्राट हे अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत योग्य परवाना असलेल्या कॅटरिंग व्यावसायिकांनाच द्यावे. जेथे कॅटरिंग व्यावसायिक हा अन्न पदार्थ तयार करतो ती जागा आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व आरोग्यदायी असावी. लग्नामध्ये जेवण तयार करताना कॅटरिंग व्यावसायिकाने अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केलेली असावी.

अन्न पदार्थाचे वितरण करणाऱ्यांना ॲप्रॉन, ग्लोव्हज व डोक्याला टोपी पुरविलेली असावी. जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी ही स्वच्छ असावीत. अन्नपदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तेथे वापरण्यात येणारे पाणी हे पिण्यास योग्य असावे. कॅटरिंग व्यावसायिकाने जेवण तयार करताना वापरण्यात येणारे दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, खवा तसेच गोड पदार्थांचा दर्जाबाबत खात्री करावी व त्याचे वेळेतच सेवन होईल याबाबत लक्ष पुरवावे. तयार अन्न पदार्थामध्ये खाद्यरंग वापरला जावू नये याबाबत देखील खात्री करावी. जेवण तयार करण्याकामी लागणारा कच्चा माल हा दर्जेदार वापरावा. याबाबत देखील लक्ष पुरवावे. लग्नाच्या ठिकाणी वाढणारे जेवण हे कॅटरिंग व्यावसायिकाने नीटनेटके झाकून तसेच योग्य त्या तापमानास ठेवावे. शिल्लक अन्न पदार्थ हे त्याकरीता कार्यरत असलेल्या एजन्सीला देण्यात यावे. तसेच उष्टे/ शिल्लक अन्न पदार्थाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी. वरील ठळक मुद्यांचे कॅटरिंग व्यावसायिकाने पालन केले आहे किंवा कसे हे लग्ननिमित्त जेवण बनविण्याचे कत्राट देताना नागरिकांनी लक्ष द्यावे. जेणेकरुन अन्न विषबाधासारख्या घटना घडणार नाहीत, असेही सहाय्यक आयुक्त पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.