सुधारित, हरित फटाकेच नागरिकांनी वापरावेत; पोलिस आयुक्तांचे आवाहन

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालय, हरित लवादांच्या आदेश, सूचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. शुद्ध हवा, शांततामय जीवनाचा नागरिकांचा हक्क अबाधित राहण्यासाठी सुधारित, हरित फटाक्यांचाच आग्रह धरून नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गुप्ता बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे आदींची उपस्थिती होती.

डॉ. गुप्ता यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानांच प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. यामध्ये सर्वोच्च न्यायालय, हरित लवादांच्या सूचनांचे नागरिकांसह फटाका विक्रेत्यांनी काटेकोरपणे पालन करावे. सिरीज फटाके (लड) यांना बंदी आहे. शिवाय रुग्णालये, न्यायालय, नर्सिंग होम, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात फटाके वाजविण्यास मनाई आहे.

तसेच सुधारित व हरित फटाके रात्री 8 ते 10 यावेळेतच वाजविण्यात यावीत. वाणिज्यिक (इ-कॉमर्स) संकेतस्थळांवरून फटाके खरेदी करू नयेत. खरेदी करण्यात येणाऱ्या फटाक्यातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, फटाक्यांचा आवाज 125 डेसिबलपेक्षा अधिक राहणार नाही, याची देखील नागरिकांनी दक्षता घ्यावी. बेरिअम साल्ट, लिथियम, मर्क्युरी आदींसह पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या फटाक्यांचा वापर नागरिकांनी करू नये, विक्रेत्यांनीही ते विकू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिवाळी सणामध्ये सर्वंकषपणे फटाक्यांवर बंदी नसली तरी पर्यावरणाचा विचार करून नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी सण साजरा करावा, असे आवाहन करत नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय दिवाळी सणाच्या पूर्वी आणि नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हवेच्या शुद्धतेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.