अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी बरखास्त; नाना पटोले यांची घोषणा

मुंबई –  नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यंनी दिली आहे.(City district president Suresh Salunkhe suspended for anti-party activities)

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मविआच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अहमदनगर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या होत्या. यानंतर जिल्हाध्यक्षांना १७ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवून दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते परंतु ७ दिवसानंतरही त्यांनी खुलासा केला नाही त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना २४ जानेवारी रोजीच निलंबित करण्यात आले असून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पिंपरी चिंचवड व कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. या पोटनिवडणुकीबाबत निर्णय झालेला आहे पण २ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची या विषयावर बैठक होणार आहे आणि या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय होईल.