संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग मोकळा, शरद पवारांनी दिला पाठिंबा

पुणे : छत्रपती संभाजीराजेंनी (Sambhajiraje) राज्यसभेची निवडणूक अपक्ष (Independent) लढवण्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीचा (MVA) पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे.  शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ असं शरद पवारांनी नांदेडमध्ये सांगिलतं. शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसही (Congress) त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील, असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे.

प्रत्येक पक्षाचे संख्याबळ किती आहे, यावर सगळं अवलंबून असतं. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतो. आमच्याकडे 10 किंवा 12 मत शिल्लक आहे. त्यांच्यानंतर शिवसेनेकडे सुद्धा चार पाच मत आहे, त्यांचीही काही अडचण राहणार नाही. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर ते सुद्धा मदत करतील, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मतं शिल्लक राहतात. तर पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता असून महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात. शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत (Rajya Sabha) जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.