सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत- दिलीप वळसे-पाटील

पुणे :- सहकारी चळवळीमुळे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या विकासासोबत परिसराचा विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नवीन जागेच्या स्थलांतरीत वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंकित जाधव आदी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, शासनातर्फे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणी, स्वस्त दरात वीज, पक्के रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. तसेच साखर कारखाने, विविध सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, दूध उत्पादक संघ यांच्यावतीने शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करुन प्रगती करावी. कळंब परिसराचा विकास करण्यास मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वित्तीय संस्थेत कारभार पारदर्शक असला पाहिजे, कर्ज वाटप करतांना कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असेही वळसे-पाटील म्हणाले.