Collector Dr. Suhas Diwase | पाणी साचून नागरिकांना असुविधेला सामोरे जावे लागू नये यासाठी उपाययोजना करा

Collector Dr. Suhas Diwase | पुणे शहर तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या हद्दीत मोठ्या पावसामुळे पाणी साचण्याची स्थिती पाहता नालेसफाई, गटारे स्वच्छता, नदी, नाल्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे काढणे याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Dr. Suhas Diwase) आपत्तीव्यवस्थापनाच्या अनुषंगाने बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसात पुणे शहर तसेच बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म पातळीवर नियोजन करावे. कठोर कारवाईसाठी पोलीस संरक्षणात एक्सकॅव्हेटर आदी यंत्रे वापरुन नाले, नद्यांच्या कडेची अतिक्रमणे काढावीत.

जाहिरात फलकांमुळे वारंवार दुर्घटना घडत असून अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंग्ज पाडण्याची कार्यवाही गतीने करावी. शासकीय यंत्रणा तसेच खासगी कंत्राटदारांकडून रस्ते तसेच अन्य बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी डॉ. पूजा मनोरमा दिलीप खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप