जिल्हाधिकारी साहेब मानलं तुम्हाला… ; ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांवर होतोय देशभरातून कौतुकाचा वर्षाव

सूरजपूर – छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार उपेंद्र दुबे यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या अकाली निधनानंतर रविवारी त्यांच्या कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यामध्ये अनेक अधिकारी येऊन अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिले. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी डॉ.गौरव सिंह यांच्या औदार्याने सर्वांनाच चकित केले.

जिल्हाधिकारी डॉ. गौरव सिंग रविवारी सकाळी अंत्यसंस्कारासाठी इतर सदस्यांसोबत उपस्थित राहिले. यावेळी मृतदेहाला खांदा देण्यापासून ते अग्निसंस्कार करण्यापूर्वीचे प्रत्येक विधी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. गौरव सिंह कुटुंबीयांसह दिसले. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे हे रूप पाहून लोकांनी त्यांचे कौतुक केले.

पत्रकार उपेंद्र दुबे हे आई, पत्नी आणि मुलासोबत त्यांच्या मूळ गावी जात होते. यादरम्यान त्यांची आई, पत्नी आणि मुलाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. सुदैवाने पत्रकार उपेंद्र दुबे हे बचावले. आता दुबे यांच्यावर अंबिकापूर येथील लाईफ लाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, उपेंद्र दुबे यांच्या कुटुंबातील तिन्ही मृतदेहांवर रविवारी एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार उपेंद्र दुबे यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूची माहिती मिळताच सूरजपूर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील बामनी येथील घटनास्थळी आपली संपूर्ण टीम पाठवली. जखमी पत्रकाराच्या चांगल्या उपचारासाठी ते स्वत: त्या ठिकाणी हजर राहिले.