जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट; गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

वाशिम – जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर आणि कारंजा तालुक्यातील काही गावातील कोविड लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान लसीकरण केंद्रावर गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजनातून काम करीत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व पात्र व्यक्तींना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस 100 टक्के देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सुट्टीच्या दिवशी सुद्धा लसीकरण करण्यात येत आहे.आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी काही केंद्रांना आकस्मिक भेट दिली. मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा, शिवणी व आसेगाव (पो.स्टे) आणि कारंजा तालुक्यातील पोहा व काजळेश्वर आणि कारंजा शहरातील दारव्हा वेस येथील लसीकरण केंद्राला भेट दिली असता, काही लसीकरण केंद्रावर ड्युटी असलेले काही कर्मचारी गैरहजर आढळून आले. या गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. जे लोक लसीकरणासाठी अद्यापही आलेले नाहीत, त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना लसीकरणासाठी केंद्रावर घेऊन यावे. गावातील कोणताही पात्र व्यक्ती लस घेतल्याशिवाय राहू नये, यासाठी कर्मचार्‍यांनी गृहभेटी द्याव्यात. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना घरी जाऊन लस दयावी. तलाठी आणि ग्रामसेवकांनी गावाची संपूर्ण माहिती घ्यावी. प्रत्यक्ष गृहभेटी दयाव्यात. मस्जिद बाहेर देखील लसीकरण केंद्र सुरू करून पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे.असे त्यांनी यावेळी सांगितले. षण्मुगराजन यांच्या भेटी दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.